अतिरिक्त जमा झालेले पैसे देण्यास नकार; सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दखल

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- बॅंकेतून व्यवहार होताना अनेकदा बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे काही जण अनपेक्षितपणे लखपती होतात. म्हणजेच नजरचुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणे, एखाद्याच्या खात्यात अतिरिक्त पैसे जमा होणे असे प्रकार घडल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे .

कर्ज मंजुर करताना नजरचुकीने बँक खात्यावर जास्त गेलेले पैसे परत देण्यास नकार देणार्‍या एका सरकारी कर्मचाऱ्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, जलसंपदा विभागाच्या नगर कार्यालयातील लिपीक कृष्णा आनंदा अंधाळे (वय- 39 रा. कर्जुले ता. पारनेर) याने पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था

येथून घरदुरुस्ती साठी 2 लाख 91 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते घेतलेले कर्ज अंधाळे याच्या स्टेट बँकेच्या खात्यात आरटीजीएस करताना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लालटाकी शाखेतील कर्मचारी अर्पणा अभिजीत भांड यांच्याकडून नजरचुकीने 2 लाख 91 हजार रुपये ऐवजी 29 लाख 10 हजार रुपये बँक खात्यात जमा झाले होते.

बँकेने अंधाळे याचे स्टेट बँकेचे खाते सील करून त्याच्या खात्यात शिल्लक असलेले 7 लाख 20 हजार रुपये परत वळवून घेतले. याबाबत मॅनेजर क्षिरसागर यांनी अंधाळे याच्याकडे विचारणा करून पैसे भरण्यास सांगितले. त्याने वेळोवेळी 10 लाख 10 हजार रुपये भरले. असे एकूण 17 लाख 30 हजार रुपये परत भरलेले आहेत.

उर्वरित 8 लाख 89 हजार रुपये व त्यावरील व्याज याबाबत अंधाळे याच्याकडे मॅनेजर क्षिरसागर यांनी वारंवार संपर्क करून पैसे भरण्यास सांगितले. परंतू तो पैसे भरत नसल्याने त्याच्याविरोधात बँक व पतसंस्थेच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लालटाकी (नगर) शाखेचे मॅनेजर लक्ष्मीकांत बाळकृष्ण क्षिरसागर (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. 8 लाख 89 हजार रूपये रक्कमेचा अंधाळे याने अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved