इको युवान वंचितांना आत्मनिर्भर बनवेल – नरेंद्र फिरोदिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-इको युवान उपक्रम वंचित तरुणांना निःश्चितच आत्मनिर्भर बनवेल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

श्रीमती आशा फिरोदिया आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते युवान संचलित इको युवान या पर्यावरणपूरक वस्तू विक्री संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. युवान द्वारे अनाथ वंचित तरुण आणि गरजू महिलांना रोजगार पुरवण्यासाठी ‘इको युवान’ हा उपक्रम मागील वर्षी सुरु करण्यात आला.

कठीण प्रशिक्षण आणि जागा संसाधने इ. अनेक अडचणींवर मात प्रकल्पातून उत्पादन सुरु झाले, तोच लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे प्रकल्पास मोठा फटका बसला. ३ महिने राबून तयार केलेल्या वस्तूंची लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष विक्री शक्य नसल्याने आणि इतर शैक्षणिक उपक्रम तात्पुरते थांबवावे लागल्याने प्रकल्पापुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.

परंतु संकटास संधी मानत आणि उपलब्ध संसाधनांचा वापर करत एक महिन्यात बॅग्स ऐवजी कापडी मास्कचे उत्पादन ‘इको युवान’ मार्फत सुरु करण्यात आले. केवळ नगर नाही तर नाशिक, मुंबई, पुणे येथून देखील प्रकल्पास लॉकडाऊन काळात मास्कच्या ऑर्डर्स मिळाल्या.

त्यामुळे प्रशिक्षित तरुण बेरोजगारांच्या किमान दैनंदिन खर्चाचा प्रश्न मिटला. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘इको युवान’ द्वारे ४००० पेक्षा अधिक कापडी मास्कचे पायी चालणारे मजूर, रेल्वे कर्मचारी, एस.टी. चालक- कर्मचारी, विविध अनाथ आश्रमातील बालकांना मोफत वितरण करण्यात आले.

काळाची गरज लक्षात घेऊन युवान स्वयंसेवकांनी कोरोना संकटातून मार्ग काढण्यासाठी अद्यावत संकेतस्थळ निर्माण करण्याचे ठरवले. विविध क्षेत्रातील तज्ञ स्वयंसेवकांच्या मदतीने www.ecoyuvaan.com या नावाने हे संकेतस्थळ कालपासून कार्यरत झाले.

एका शहर, जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता ‘इको युवान’ मार्फत संकेतस्थळाच्या मदतीने आता देशभर उत्पादन पुरविले जाऊ शकेल, ही नगरकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन शांतीकुमार फिरोदिया ट्रस्टच्या प्रमुख आशाताई फिरोदिया यांनी याप्रसंगी केले.

‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेस अशा लहान- लहान उद्योगांमधूनच यश मिळणार असल्याचे आणि आपल्या ‘इंडिया नेटवर्क’ मार्फत इको युवान सारखे १०० उद्योग घडविण्याचा मानस फिरोदिया यांनी यावेळी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment