चक्क मंत्री गडाखांच्या वस्तीवर बिबट्याचे दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. प्राण्यांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीकडे आपली वाटचाल केली आहे.

यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनईतील वस्तीजवळ सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले.

उदयन गडाख व नितीन काळे शनिवारी रात्री घराकडे जात असताना शेजारच्या उसातून आवाज आल्याने त्यांनी गाडी थांबवली. घराच्या डाव्या बाजूने बिबट्या शेतात जाताना त्यांना दिसला.

त्यांनी मोबाइलमध्ये त्याची छबी टिपली. दोन दिवसांपूर्वी घरापासून दोनशे मीटर अंतरावर बिबट्या दिसला होता. वन विभागास माहिती दिल्यानंतर रविवारी मंत्री गडाख यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला.

नऊ महिन्यांपूर्वी याच वस्तीजवळील पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. नागरिकांनी रात्री शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved