जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी, कामगारांचा मोर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा कामगार आणि किसान संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात मोर्चा धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आंदोलकांनी कामगार, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

या मोर्चात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, अंबादास दौंड, सिटूचे कॉ. महेबुब सय्यद, संताराम लोणकर, महादेव पालवे, सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, विलास पेद्राम, शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, किसान सभेचे विकास गेरंगे,

विडी कामगार युनियनच्या भारती न्यालपेल्ली, महापालिका कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे, शिक्षकेतर संघटनेचे भाऊसाहेब थोटे, सतीश पवार, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शोभा तरोटे, विजया घोडके, सुभाष कांबळे आदी सहभागी झाले होते.

भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात झालेल्या सभेत प्रमुख वक्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात जोरदार टिका करुन सरकार शेतकरी, कामगार, शिक्षक आदी सर्व घटकांना देशोधडीला लाऊन भांडवलदारांचे हित जोपासत असल्याचा आरोप करण्यात आला.

टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.

या मोर्चात प्रत्येक संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, आशा-गटप्रवर्तक, विडी कामगार, पतसंस्था कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बाजार समिती, हमाल-मापाडी संघटनांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून जिल्ह्यात बंद यशस्वी केला.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. शेतकरीविरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता कायदे रद्द करावे, किमान वेतन दरमहा 21 हजार रुपये देण्यात यावे, असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य, विमा पेन्शन, एसआय,

भविष्य निर्वाह निधी आदि सामाजिक सुरक्षा लागू कराव्या, आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना सहा महिने मासिक 7 हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य आणि सर्व गरजूंना पुढील सहा महिन्यांसाठी 10 किलो अन्नधान्य मोफत देण्यात यावे, रेशन व्यवस्था बळकट करून त्यात रॉकेल व साखर सहित सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा,

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करावे, पेट्रोल आणि डिझेल वरील केंद्रीय करांमध्ये कपात करून महागाई रोखावी, सर्वांना नोकर्‍या किंवा बेरोजगार भत्ता द्यावा, रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलण्यात यावी, सर्वांसाठी मोफत सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी,

कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणार्‍या आशा आणि अंगणवाडी सेविका, एनएचएम कर्मचारी या सर्व खाजगी, शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना सुरक्षा साधने प्रदान करुन त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, सर्व मूलभूत कामगार कायद्याची पुनर्स्थापना करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी,

शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये कर्मचार्‍यांना जबरदस्तीने वेळेआधी निवृत्ती करण्याचे क्रूर परिपत्रक मागे घ्यावे, डीसीपीएसची नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, ईपीएस 95 मध्ये मध्ये सुधारणा करण्यात यावी, कायमस्वरूपी काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणे वेतन द्यावे,

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावी व स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचे गठन करावे, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार शेतकर्‍यांच्या मालाला किफायतशीर भाव द्यावा, शेतकर्‍यांची जबरदस्तीने जमीन अधिग्रहण न करता कर्जमाफी,

ओला, कोरडा दुष्काळात मदत आणि नुकसान भरपाई मिळावी, सार्वजनिक व शासकीय क्षेत्रात रिक्त जागा त्वरित भरती भराव्या, त्याचप्रमाणे आशा कर्मचारी,

ग्रामपंचायत कर्मचारी, पतसंस्था कर्मचारी, विडी कामगार, अंगणवाडी कर्मचारी, मार्केट कमिटी, बांधकाम कामगार, औषध विक्रेते, एमआयडीसी कामगारांच्या विविध एकूण 38 मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment