अवाजवी पठाणी वसुली करणार्‍या खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई व्हावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांना वेठीस धरुन बेकायदेशीर वसुली केल्यामुळे अशा फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, चांदा (ता. नेवासा) येथील सराईत गुन्हेगारावर संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, उपवनसंरक्षक कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक यांच्यावर वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल व्हावा व मध्यम प्रकल्प विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या विरुद्ध सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

या उपोषणात छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दिपक वर्मा, सुभाष आल्हाट, सुनिल वाडेकर, विलास झरेकर, राजू पाटोळे, राम कराळे, प्रा. देवेंद्र कवडे, योगेश चांदणे, भरत उमाप, अमोल काळे, रजनी ताठे, सखाराम चांदणे, संतोष निकम, मानिक कोरडे, जालिंदर गाले, लक्ष्मण पवार, इंदूबाई पंडित, अनिता गायकवाड, विनोद साळवे आदी सहभागी झाले होते. शहरासह जिल्ह्यातील अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे. टाळेबंदी काळात थकलेल्या हप्त्याच्या नावाखाली कर्जदारांना लुटण्याचा व्यवसाय खाजगी फायनान्स कंपन्यांनी सुरु केला आहे.

फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आत्महत्या सुरु केल्या आहेत. अशा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करणार्‍या खाजगी फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. सावेडी भागात एयु फायनान्स बँक यांनी जालिंदर नामदेव गाले (रा. मिरी, ता.पाथर्डी) यांना वाहन कर्ज दिलेले होते. वाहनाचे नियमित हप्ते भरुन देखील वाहनाचे कागदपत्र बँकेने कर्जदारास सध्या दिलेले नाही. संबंधित बँकेने गैरमार्गाचा अवलंब करून एका हप्त्याची अफरातफर केल्याचे आढळले असून, याबाबत बँकेकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केले असता

बँकेचे मॅनेजर व कर्मचारी यांनी गाले यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन फौजदारी कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच बेकायदेशीर नोटीस पाठवून आरबीआयच्या निर्देशाची पायमल्ली करून अवाजवी रकमेची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे सावेडी येथील चोला मंडलम फायनान्स कंपनीने अशोक किसन कासार या ग्रामीण भागात राहणार्‍या शेतकर्‍यास वाहन कर्ज दिले होते. कर्जाची वसुली 30 समान हप्त्याने करण्याबाबतचे लेखी करार फायनान्स कंपनी व कर्जदार यांच्यात झाला होता. त्याप्रमाणे कासार यांनी 30 हप्ते नियमितपणे भरलेले असताना देखील फायनान्स कंपनीचे खासगी वसुली एजंटांनी कासार यांच्या घरी जाऊन दमदाटी करुन 34 हप्त्यांची बेकायदेशीर वसुली केलेली आहे.

आजही फायनान्स कंपनीचे वसुली एजंट कासार यांच्या घरी जाऊन हप्त्याची मागणी करीत आहे. कासार यांनी वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करुनही त्यांना अद्यापि कागदपत्रे देण्यात आलेले नाही. तसेच मंडलम फायनान्स कंपनीने दिपक साहेबराव चांदणे यांच्याकडील वाहन टाळेबंदी काळात खाजगी वसुली एजंटामार्फत मारहाण करुन त्यांच्याकडील वाहन हिसकावून घेतले. अशाच प्रकारे आयु फायनान्स सर्जेपुरा यांनी अभिजीत रोहोकले (रा. भाळवणी, ता.पारनेर) व बजाज फायनान्स कंपनीने रावसाहेब शंकर काळे (रा. नगर) यांची आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांची पायमल्ली करून बेकायदेशीर मार्गाने वसुली करण्याचा हेतू चालविला आहे. तर कर्जदारास मानसिक त्रास देण्यात येत आहे.

खाजगी वसुली एजंट कर्जदाराच्या घरी पाठवून वसुलीसाठी धमकाविण्याचे प्रकार सुरु असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांना वेठीस धरुन बेकायदेशीर वसुली केल्यामुळे अशा फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, सराईत गुंड संदीप दहातोंडे (रा. चांदा, ता. नेवासा) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने खंडणी वसूल करण्यासाठी दिपक साहेबराव चांदणे यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करीत गाडी हिसकावून घेतली असता सदर आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी,

उपवनसंरक्षक कार्यालयामध्ये कार्यरत सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी व मध्यम प्रकल्प विभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमती एम.एच. शेख यांच्याकडून होणार्‍या अन्यायाचे निवारण होऊन त्यांच्याविरुद्ध सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment