रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक व्हावी सीबीआयमार्फत हत्याकांडाचा चौकशी करावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बडेकर, अनिता आंग्रे, अलका लोंढे, अर्पिता बडेकर, सुनिता घोडके आदि उपस्थित होते. सध्या समाजामध्ये महिलांवर होत असलेले हल्ले व बलात्काराचे प्रमाण वाढत आहे.

ते थांबवण्यासाठी शासनाने व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेणे गरजेचे आहे. नुकतेच यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. समाजसेवेचे कार्य करणार्‍या एका महिलेला सुपारी देऊन भररस्त्यात हत्या करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे.

या प्रकारामुळे महिलांना समाजामध्ये वावरणे कठीण झाली आहे. तर सामाजिक कार्य करणार्‍या महिलांमध्ये एक प्रकारची भिती निर्माण झाली असून, महिला समाज कार्यासाठी पुढे येण्यास टाळाटाळ करणार आहे. आज राज्यात व देशात पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्यात आले असले तरी त्या असुरक्षित आहेत.

महिलांना शासनाच्या नियमाप्रमाणे सबलीकरण करणे योग्य वाटत असेल तर यापुढे समाजकारण करणार्‍या महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवानगी देण्याची गरज आहे. याद्वरे महिला आपले संरक्षण स्वतः करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

तसेच आरपीआय महिला आघाडीच्या वतीने पोलीसांनी रेखा जरे हत्याप्रकरणात चोवीस तासात मारेकर्‍यांना अटक केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. या हत्याकांडचा उलगडा होण्यासाठी जरे यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे, जेणेकरून पोलीस प्रशासनाला सदर प्रकरणातील गुन्हेगारांचा योग्य तपास करता येईल.

ज्या दिवशी जरे यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे वेळोवेळी लोकेशन कोण घेत होते? त्याचीही कसून चौकशी करण्यात यावी, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार यांना लवकरात लवकर अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर प्रकरणाची तात्काळ सीबीआयमार्फत चौकशी करावी व महिलांचे संरक्षण होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment