आज अर्जांची छाननी ७६७ ग्रामपंचायतीसाठी २३ हजार ८१८ अर्जदाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नियंत्रणात सुरू आहे.

काल बुधवारी अंतिम मुदतीपर्यंत एकूण २३ हजार ८१८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज गुरूवार दि. ३१ डिसेंबर रोजी छाननी प्रक्रिया होणार असल्याची माहिती महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.

माहे जून ते माहे डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. या निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या होत्या.

यात जिल्हयातील ७६७ ग्रामपंचायतींचे तब्बल सव्वासात हजार सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी तब्बल साडेपंधरा लाख महिला, पुरुष मतदारांची सूचि आहे.

येत्या १५ जानेवारीस मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून मतमोजणी १८ जानेवारीस होणार आहे. या निवडणूकीसाठीचे काटेकोर नियोजन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या निर्देशात करण्यात आले आहे.

दरम्यान, संगणकिय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया असताना, इंटरनेटची गती कमी असणे, सव्हेर डाऊन असणे आदी तांत्रीक अडचणीमुळे इच्छुक उमेदवारांच्या अडचणी वाढल्या.

त्याची दखल घेत इच्छुक उमेदवार निवडणूकीपासून वंचीत राहू नये, या हेतूने पारंपारीक अर्थात ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्विकृतीचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला.

तसेच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत अडीच तासांची वाढ करण्यात आली होती. काल बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज स्विकारले. बुधवारी अखेरच्या दिवशी जिल्हाभरात १५ हजार ५५२ अर्ज दाखल झाले.

Leave a Comment