तमाशा कालावंतांच्या मागण्यांसाठी सोमवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-अखिल भारतीय मराठी लोककलावंत परिषदेच्या वतीने लोकनाट्य तमाशा कलावंत, फड मालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. ४ जानेवारी पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची

माहिती अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष हसन शेख पाटेवाडीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्र शासनाने लोकनाट्य तमाशा क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख असलेला सुधारित शासन निर्णय काढावा, लोकनाट्य तमाशा मंडळास कायमस्वरूपी अनुदान मिळावे. पोलीस प्रशासनाकडून ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी विनाअट मिळावी.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या विविध समित्यांमध्ये जेष्ठ तमाशा कलावंतांची निवड व्हावी, कोरोना महामारी व लॉक डाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तमाशा कलावंतांना प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत शासनाने करावी.

राज्यातील लोककलावंतांच्या उन्नतीसाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार परिषदेने व्यक्त केला आहे.

कोरोना महामारी व लॉक डाऊनमुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या लोकनाट्य तमाशा चे कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, महसूल मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अनेक वेळा निवेदने दिली.

मात्र पोकळ आश्वासहनांच्या पलीकडे तमाशा कलावंतांच्या पदरात काहीही पडले नाही. त्यामुळे परिषदेने आपले आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक करण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी आमच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही.

असा निर्धार अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, अध्यक्ष आविष्कार मुळे, व सचिव मोहित नारायणगावकर, उपाध्यक्ष शेषराव गोपाळ, मयूर महाजन, सुनिल वाडेकर, हसनशेख पाटेवाडीकर यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ नोव्हेंबर २०२० रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याबाबत जो शासन निर्णय काढण्यात आला. त्यात लोकनाट्य तमाशा क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे पोलीस प्रशासन लोकनाट्य तमाशा सादर करण्यास परवानगी देत नाही.

त्यामुळे सांस्कृतिक विभागाने लोकनाट्य तमाशाचा स्पष्ट उल्लेख असलेला सुधारित शासन निर्णय काढावा. यासह वरील मागण्या परिषदेने शासनाकडे केल्या आहेत.

Leave a Comment