आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करायचे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विविध लग्नसमारंभांमध्ये मौल्यवान दागिने चोरी जाण्याच्या घटनांत वाढ झाली होती. यामुळे गुन्हे शाखेची पथके घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना

नाशिक पोलिसांनी वऱ्हाडीचा बनाव करत लग्नाला उपस्थित राहून तेथे रेकी करत, मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मध्यप्रदेशच्या इंदुरमधून मुसक्या आवळल्या.

याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर महिन्यात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ४० हजाराची रोकड चोरी गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना शहरात कुठल्याहीप्रकारचे धागेदोरे मिळत नव्हते.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला याबाबत माग काढण्याचे आदेश दिले. पथकाने समांतर तपास सुरु केला; मात्र गुन्ह्याची कार्यपध्दती अत्यंत वेगळ्या प्रकारची असल्याने पुर्वानुभवाच्याअधारे या गुन्ह्यात सहभागी गुन्हेगार हे सराईत मध्यप्रदेश राज्यातील असल्याचा कयास पोलिसांनी लावला.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंद वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, येवाजी महाले, विशाल काठे यांच्या पथकाने अत्यंत तोकड्या माहितीवरुन मध्यप्रदेशमधील इंदुर गाठले. इंदुरसह विविध शहरांमध्ये गोपनीयरित्या माहिती घेत तीन दिवस पथकाने ठिकठिकाणी सापळेही रचले मात्र गुन्हेगार पथकाच्या हाती लागत नव्हते.

मिळालेल्या एका सुगाव्यावरुन पोलिसांनी संशयास्पद कारवर पाळत ठेवली आणि एका ढाब्याच्या आवारात सापळा लावला. राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट कारमधून (एम.पी०४ टीसी १३३२) संशयित गुन्हेगार ढाब्यावर आले असता साध्या वेशातील पथकाने सिनेस्टाइल त्यांना ताब्यात घेतले. अजयसिंग कप्तानसिंग सिसोदिया (२५), बादल कृष्णा सिसोदिया (१९), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (४५,रा.तिघे गुलखेडी, पिपलीयारसोडा, जि.राजगड, मध्यप्रदेश) अशी तीघा संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी या तीघांकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त केले आहेत. या तीघांना गंगापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Comment