Ahmednagar CityAhmednagar News

नेहरू पुतळ्या समोरील होर्डिंग्ज काँग्रेस जिजाऊ जयंतीदिनी बुलडोझरने स्वतः हटविणार !

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- विद्यार्थी काँग्रेसने लालटकी येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला झाकून टाकणारे होर्डिंग काढून टाकण्यासाठी महानगरपालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

सात दिवस लोटले तरी देखील जातीयवादी भाजपची सत्ता असणाऱ्या मनपाने जाणीवपूर्वक होर्डिंग्ज हटविले नसल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निषेधार्थ मनपामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार ठिय्या आंदोलन केले. पंडित नेहरू अमर रहेचे फलक हातात धरत यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यामुळे संपूर्ण मनपामध्ये आणि शहरामध्ये काँग्रेस आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू होती.

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, मनपा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. जातीयवादी असणाऱ्या भाजपची महापालिकेत सत्ता आहे यामुळेच हा सर्व प्रकार सुरु आहे. या सत्तेत स्थानिक राष्ट्रवादी भागीदार आहे. त्यांनी देखील या बाबतीत काही भूमिका घेऊन नये ही काँग्रेससाठी खेदाची बाब आहे. अशी टीका काळे यांनी केली. पं.नेहरू हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देशाचे पहिले पंतप्रधान होते.

पुतळ्याच्या परिसराची दैनावस्था मनपाच्या गलथान कारभारामुळेच झालेली आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. पं. नेहरू हा विषय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आस्था आणि श्रद्धेचा आहे हे मनपाने विसरू नये. एका बाजूला नगर शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नागरिक हवालदिल झालेले आहेत.

चांगलं काही करण्यामध्ये मनपातील सत्ताधारी पूर्णता अपयशी आहेतच पण त्याचबरोबर पंडित नेहरू पुतळा आणि परिसराची दैनावस्था करून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखण्याचे पाप जाणीवपूर्वक केले आहे असे काळे म्हणाले.

यावेळी फारुख भाई शेख, खलिल सय्यद, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप यांची भाषणे झाली.

मागासवर्गीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, अनंतराव गारदे, कौसर खान, नीताताई बर्वे, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते पाटील, चेतन रोहोकले, डॉ. रिजवान शेख, प्रमोद अबुज, अमित भांड, अजित वाडेकर, शरीफ सय्यद, विकी करोलिया, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

जिजाऊ जयंतीदिनी काँग्रेस स्वतः होर्डिंग्ज हटविणार मनपाने काँग्रेसच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वतः १२ जानेवारीला जिजाऊ आणि विवेकानंद जयंतीदिनी जिजाऊ, विवेकानंद पुतळ्याला अभिवादन करून बुलडोझरने स्वतः होर्डिंग्ज हाटवतील, अशी घोषणा आंदोलनाच्या समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी मनपा जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. पक्षाच्या या भूमिकेची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली जाणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button