शिशू केअर युनिटला आग दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. मध्यरात्री सर्व निद्रिस्त असताना काळाने डाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली.

बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली. माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं.

अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाल.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली.

Leave a Comment