माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार विखेंची शिष्टाई असफल शेतकऱ्यांची फसवणूक थांबेपर्यंत आंदोलनावर ठाम : हजारे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जो पर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक केंद्र सरकारकडून थांबत नाही तो पर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार सुजय विखे पाटील यांना सांगितले.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता या पाश्वर्भूमीवर माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार सुजय विखे यांनी शनिवारी सायंकाळी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन उपोषण न करण्यासाठी मनधरणी केली.

परंतु अण्णांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगत महाजन व विखेंना माघारी पाठवून दिले. महाजन व विखे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले की,  गेल्या चार वर्षांपासून शेतकरी हिताच्या प्रश्नांवर केवळ चर्चा सुरू आहे. त्यासाठी आपण दोनदा उपोषण केले. दोनही वेळेस अश्वासने दिली गेली.

पण पाळली नाहीत. दुसरीकडे शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत दीडपट किमान आधारभूत किंमत दिली जात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आपण आपल्या शेवटच्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे हजारे म्हणाले.

बैठकीदरम्यान महाजन यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हजारे यांची भ्रमणध्वनीवर चर्चा घडवून आणली. फडणवीस यांनीही पंतप्रधान कार्यालय आपल्या मागण्यांसंदर्भात गंभीरपणे विचार करीत आहे. आपणही पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहोत. आपण सरकारला वेळ द्यावा अशी विनंती फडणवीस यांनी हजारे यांना केली.

दरम्यान हजारे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेचा तपशील आपण केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना तसेच पंतप्रधान कार्यालयाला देणार आहोत. लवकरच हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेनंतर सांगितले.

बैठकीनंतर बोलताना हजारे म्हणाले की, चर्चा सकारात्मक झाली असली तरी आपले समाधान झालेले नाही. आपल्या मागण्या मान्य झाल्या तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. सरकारने चर्चेत वेळ घालवण्याऐवजी आता निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Leave a Comment