शेतकऱ्याचा २५ क्विंटल कांदा चोरला पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथील घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-सध्या शहर व ग्रामीण भागात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी तर भरदिवसा घरफोड्या, रस्तालुटीच्या घटना घडत आहेत.
आता हे कमी झाले म्हणून ग्रामीण भागातील चोरट्यांनी नामी शक्कल लढवली आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे चोरट्यांनी चक्क २५ क्विंटल कांदे व ताडपत्रीच चोरून नेली आहे.
आजवर आपण चोरट्यांनी मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे ऐकले होते. परंतु मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील चोरट्यांनी मौल्यवान वस्तू सोडून शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी,दुभत्या गायी,
शेळ्या, मेंढ्या असे पाळीव प्राण्यांची चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि आता तर थेट कांदाच चोरून नेल्यामुळे या घटनेचा तपास तरी कसा करावा असा प्रश्न देखील पोलिसांना पडला असेल.
पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथील शेतकरी संतोष रावजी झिंजाड यांनी त्यांच्या गट क्रमांक २५३ मधील शेतात कांद्याची लागवड केली होती.
सध्या त्यांनी या कांद्याची काढणी करून विक्री करण्यासाठी कापणी करून तो कांदा शेतातच ताडपत्री अंथरून त्यावर झाकूण ठेवला होता.
परंतु अज्ञात चोरट्यांनी दि.८ ते ९ जानेवारी या काळात झिंजाड यांचा कापणी केलेला सुमारे २५ क्विंटल कांदा व त्याखाली टाकलेली ताडपत्री असा सुमारे ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत झिंजाड यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved