जिल्ह्यातील पक्ष्यांच्या मृत्यू प्रकरणी गडाख म्हणाले कि….

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात आतापर्यंत विविध 18 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे.

या सर्व पक्ष्यांपैकी चार अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित 14 पक्ष्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, बर्ड फ्लू पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या परिसरात प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

यावेळी गडाख म्हणाले, जिल्ह्यात 3 हजार 341 पोल्ट्री फार्म असून, त्यात 1 कोटी 14 लाख मांसल कोंबड्या, 76 हजार अंडी देणार्‍या कोंबड्या व सुमारे 89 लाख परसातील कोंबड्या अशा एकूण पावणेतीन कोटी कोंबड्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 18 ठिकाणी कोंबड्या व कावळे, कबुतर, बुलबुल, भारद्वाज असे पक्ष्यांची मृत्यू झाले आहे.

त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून चार अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळा व चिचोंडी येथील कोंबडीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मिडसांगवी व निंबळकचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अन्य ठिकाणचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

चिंचोडी येथील कोंबड्यांमध्ये एच 5 एन 8 हा विषाणू आढळला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पॉझिटिव्ह आलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत, असे गडाख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button