अखेर जमीन गैरव्यवहार प्रकरणी ‘ते’ सरपंच पोलिसात हजर

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल होता, यामध्ये अटकपूर्व जामीन मिळाला नाही म्हणून  आंबिजळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास निकत आज कर्जत पोलीस स्टेशनला हजर झाले.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील निर्मलाबाई हिराचंद ऊर्फ हिरालाल गांधी यांची मिरजगाव येथील रस्त्यालगत असलेल्या २ हेक्टर १८ आर हे क्षेत्र त्यांच्या परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी करण्यासाठी दुसरी महिला उभी करून खरेदी केल्या प्रकरणी ३१ जानेवारी २०२० रोजी कर्जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील इतर आरोपींना अटक करून तपास केल्यानंतर यामध्ये आंबिजळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास निकत यांचे नाव पुढे आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जामीन मंजूर झाला व ते सुटले मात्र विलास निकत हे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील होते.

अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय श्रीगोंदा व औरंगाबाद खंडपीठात प्रयत्न केले. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला नाही. म्हणून आज त्यांनी कर्जत पोलीसात हजर होण्याचा निर्णय घेतला. व ते कर्जत पोलीस स्टेशनला हजर झाले.

कर्जत पोलीसात हजर होण्यापूर्वी ते प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मिरजगाव येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणाशी माझा काही संबंध नाही,

मला आंबिजळगांव येथील जनतेने जनतेतून सरपंच म्हणून निवडून दिले आहे, माझ्या राजकीय विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठी  व माझे राजकारण संपविण्यासाठी या प्रकरणात अटक असलेल्या आरोपींना माझे नाव घेण्यासाठी भाग पाडले. यामुळे या प्रकरणात माझे नाव आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button