कापूस खरेदी केंद्रावर गडबड घोटाळा; शेतकऱ्याने पोलिसात दिली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शेतकऱ्याने आपला कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळून आली.

दरम्यान हीबाब संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार तहसीलदार व पोलिसांकडे केली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार शेवगाव तालुक्यातील कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दिवटे येथील ॲड. प्रकाश आसाराम कणसे (वय ३०) यांनी कापूस विक्रीसाठी काही दिवसांपूर्वी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती फेडरेशनच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती.

यानुसार सदरील फेडरेशनकडून १७ जानेवारी रोजी फोन करून संबंधित शेतकऱ्यास कापूस घेऊन अमरापूर येथील आनंद काॅटन अँड जिनींग मील येथे बोलावले.

त्यावेळी कणसे यांनी सोमवारी (दि.१८) गणेश जगताप यांच्या मालकीच्या भाडोत्री टेम्पो क्रमांक (एम.एच.-१५ एजी ८२८७) मधून कापूस अमरापूर येथे नेला. याठिकाणी कापूस भरलेल्या टेम्पोचे वजन ६२ क्विंटल १५ किलो भरले.

त्यानंतर रिकाम्या टेम्पोचे वजन केले असता ते ३० क्विंटल ५५ किलो भरले. यावेळी संबंधित शेतकऱ्यास रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत असल्याचा संशय आला.

तेव्हा त्यांनी सदरील रिकाम्या टेम्पोचे वजन साई वे ब्रिज या खासगी वजनकाट्यावर केले असता ते २९ क्विंटल ७० किलो भरले. पुन्हा अधिकच्या खात्रीसाठी त्यांनी मार्केट कमिटीच्या ॲग्रील प्रोड्यूस येथील काट्यावर वजन केले तर ते २९ क्विंटल ६५ किलो भरले.

सदरील दोन्ही ठिकाणच्या व कापूस खरेदी केंद्रावरील काट्यात ८५ ते ९० किलोची तफावत आढळून आली. याबाबत प्रकाश कणसे यांनी संबंधित जिनींग चालक व ग्रेडर यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.

परंतु, संबंधितानी उडवाउडवीची उत्तरे देऊन सदरील वजनाची भरपाई देण्यास नकार दिला, अशी लेखी तक्रार कणसे यांनी तहसीलदार व शेवगाव पोलिस स्टेशनला दिली आहे. संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करून फसवणुकीची रक्कम देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button