वीजबिले भरणेबाबत सवलत द्या अन्यथा….मनसेने दिला महावितरणला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- महावितरण कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातील थकीत वीजबिल भरण्यासाठी आदेश जारी करून वसुली सुरू केली आहे. ती थांबवून कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी तीन टप्प्यांची सवलत द्या, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच सदर मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीबाबतचे निवेदन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकांना अद्याप काम धंदा नाही. व्यवसाय सुरळीत चालत नाही. त्यामुळे घराच्या परिवाराचा गाडा ओढणे अवघड झालेले असताना आठ महिन्यापासून वाढीव वीज बिलाबरोबर व्याजाच्या टक्केवारीने फुगलेली बिले भरण्यासाठी शब्द देऊन कुठेही सरकारने वीज बिलात सवलत दिलेली नाही.

त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झालेला असून बिल भरण्यास लोक तयार आहेत; परंतु आपण सर्व नागरिकांच्या परिवाराचा विचार करून बिलामध्ये कमीत कमी तीन टप्पे करून सदर लाईट बिल भरून घेण्याचे सहकार्य करावे,

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनातून म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button