ते हिंसक आंदोलन देशासाठी कलंक; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर कूच केली.

यादरम्यान झटापट झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज तर शेतकऱ्यांनी दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. या हिंसाचारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा दुर्दैवी आणि देशाला काळीमा असलेली घटना असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे. अण्णा म्हणाले की, दिल्लीमधल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं ही आपल्या देशाच्या दृष्टीने दुर्घटना असून हा एक कलंक आहे.

कारण आज देशाचा प्रजासत्ताक दिन आहे, आजच्या दिवशी या देशात प्रजेची सत्ता आली आणि देशातील प्रजा मालक झाली, राष्ट्रीय संपत्ती देशाची झाली.

अशा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतले, समाजाला त्रास झाला राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, ही दुर्दैवी घटना आहे.

पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, वास्तविक देश शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांसाठी आज राळेगणसिद्धी परिवाराने ट्रॅक्टर रॅली काढली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे गैर नाही.

मात्र, कोणतेही आंदोलन हे घटनेने दिलेल्या अधिकारात झाले पाहिजे. घटनेमध्ये कोणत्याही हिंसेला थारा नाही. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेले हिंसात्मक आंदोलन हे मोठे दुर्दैव आहे.

हा देश घटनेच्या आधारावर व लोकशाही माध्यमातून काम करत आहे. यात आंदोलन करणे चुकीचे नाही. मात्र, देशातील प्रत्येक सार्वजनिक मालमत्ता ही जनतेच्या मालकीची आहे.

तिचे नुकसान जनतेनेच करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात हिंसा होत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नसल्याचे अण्णा यांनी परखड मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button