चिंताजनक : नव्या स्वरूपातील कोरोना विषाणूचा तब्बल ७० देशांत प्रसार !

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-ब्रिटनमधील नव्या स्वरूपातील कोरोना विषाणूचा जवळपास ७० देशात तर दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्वरूपाच्या विषाणूचा जवळपास ३१ देशांमध्ये प्रसार झाला आहे.

मूळ विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य असलेला हा कोरोनाचा अवतार लसीकरण मोहिमेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण हा विषाणू सध्याच्या लसीचा प्रभाव आणि शरीरातील अँण्टीबॉडीच्या संरक्षणाची तीव्रता कमी करू शकतो,

असा इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने बुधवारी दिला आहे. ब्रिटनमध्ये २५ जानेवारी रोजी आढळलेल्या नव्या स्वरूपातील विषाणूचा जगात वेगाने प्रसार होत आहे. आठवडाभरात आणखी १० देश या विषाणूच्या तावडीत सापडले आहेत.

त्यामुळे या विषाणूचा प्रसार झालेल्या देशांची संख्या ७० झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गत आठवड्यात नवीन अभ्यासाचा हवाला देत हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक असल्याचा इशारा दिला होता.

मात्र, डब्ल्यूएचओने हा अभ्यास प्रारंभित पातळीवरचा असल्याचे नमूद करत याप्रकरणी आणखी सखोल अभ्यासाची गरज व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्वरूपातील विषाणूचा प्रसार झालेल्या देशांची संख्या ८ ने वाढून ३१ इतकी झाली आहे.

मूळ विषाणूपेक्षा हा विषाणू अँण्टीबॉडीच्या संरक्षणाच्या तीव्रतेला अधिक प्रमाणात कमी करू शकतो. त्यामुळे पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढण्याची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button