कामांकडे दुर्लक्ष करून सेलिब्रेटींमागे फिरू नका; साईसंस्थांचा कर्मचाऱ्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरात व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी आल्यानंतर काही कर्मचारी या लोकांच्या मागे मागे फिरताना दिसतात.

त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे संस्थांनचे कायम किंवा कंत्राटी कामगार कामाव्यतिरिक्त सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी लोकांबरोबर श्री साई मंदिर किंवा परिसरात फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर व त्यांच्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिले आहेत.

याबाबत बगाटे यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. यात म्हटले आहे की, श्री साई दर्शनाला देश-विदेशातील अनेक व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, सेलिब्रिटी येत असतात. ते आल्यानंतर संस्थांनचे काही कर्मचारी त्यांच्या मागे मागे फिरताना आढळून आले आहेत. हे कर्मचारी त्यांच्याबरोबर फोटोसेशनही करतात व ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात.

त्यामुळे संस्थानला या सेलिब्रिटींच्या बंदोबस्तात अडचण येते. यापुढे असे कुणी करू नये. संस्थांनचे कायम किंवा कायम कंत्राटी किंवा ठेकेदाराकडील कंत्राटी कामगार, आऊटसोर्सिंग कामगार यापैकी कुणीही आपल्या ड्युटी काळात, ड्युटी व्यतिरिक्त श्री साईबाबा संस्थान परिसरात किंवा मंदिरात व्हीआयपी किंवा सेलिब्रिटींबरोबर फिरताना

आढळल्यास त्यांच्यावर व त्यांच्या विभाग प्रमुखांवरही कारवाई करण्यात येईल. अत्यावश्यक व्हीआयपी किंवा जवळचा सेलिब्रिटी असेल व त्यांच्या बरोबर जायचे असेल तर उपकार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेऊनच जावे. उपकार्यकारी अधिकारी उपलब्ध नसतील तर मुख्य लेखाधिकारी यांची परवानगी घेऊनच जावे.

अन्यथा जाऊ नये. आपल्या ड्युटी व्यतिरिक्त संस्थान परिसरात जर आवश्यकता असेल तर उपकार्यकारी अधिकारी यांची परवानगी घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या आदेशात दिला आहे. यामुळे कामाव्यतिरीक्त बाहेर फिरणाऱ्या संस्थानच्या कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button