दर्जेदार रस्त्यासाठी मनपा मटेरियल व डांबराचे टेस्टिंग घेणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शहरातील डांबरी रस्ते वर्ष, दोन वर्षात उखडण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच एकाच पावसात रस्ता वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय होत आहेत.

रस्त्यांबाबत मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी दाखल झालेल्या आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी रस्त्याचे मटेरियल व डांबराचे नमुने घेऊन त्याचा दर्जा तपासणीसाठी मनपाकडून ॲस्ट्रॅक्ट मशिन कार्यान्वीत करण्यात आले आहे.

यामुळे ठेकेदारांना देखील चाप बसणार आहे. सोमवारी सकाळी शहरातील चार, पाच रस्त्याच्या मटेरियलचे व डांबराचे नमुने घेण्यात आले.

शहर अभियंता सुरेश इथापे, उपअभियंता मनोज पारखे, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते. शहर व उपनगरात सध्या सात ते आठ ठिकाणी डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत.

या सर्व रस्त्यांचा कामांचा या मशिनव्दारे दर्जा तपासला जाणार आहे. रस्ते दर्जेदार होण्यासाठी डांबराचे प्रमाण योग्य राहिले पाहिजे.

ॲस्ट्रॅक्ट मशिनव्दारे त्याची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. गेल्या दोन, तीन महिन्यांपासून यासाठी आपला प्रयत्न सुरू होता. टेस्टिंगमुळे ठेकेदारांवर वचक राहणार असल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे म्हणाले.

Leave a Comment