पैसे मिळवण्यासाठी मोदी सरकार काय-काय विकणार?; वाचा यादी

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वित्तीय वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या.

कोरोना संकट आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली. त्यातच लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प झाल्यानं सरकारला मिळणारा महसूल आटला.

मात्र कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रावरील खर्च वाढला. त्यामुळे जनतेला दिलासा देताना दुसऱ्या बाजूला महसूल वाढवण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर होतं.

आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केलीय. तसेच एका विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलीय.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केलाय. त्यावेळीच ही मोठी घोषणा करण्यात आलीय. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. व्यवसाय करण्याच्या सोयीसाठी स्वतंत्र प्रशासकीय रचना करण्यात येईल.

जेणेकरून कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही. गुंतवणूकदारांसाठी एक नवीन तरतूद करण्यात आलीय. विमा क्षेत्रात एफडीआय 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

2022 आर्थिक वर्षासाठी 20 हजार कोटी सरकारी बँकांना देण्यात येणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलंय.आर्थिक तूट कमी करण्यासाठी सरकारनं बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षात सरकार बीपीसीएल, एअर इंडिया, कॉनकोर, एससीआयमधील गुंतवणूक कमी करेल.

एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षात आणण्याची सरकारची योजना आहे. शेअर बाजारातील तेजी पाहता सरकार सीपीएसईमधील हिस्सा ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून विकू शकतं. याशिवाय खासगीकरणाच्या अनेक योजना 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button