कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल इतक्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- कोरोना महामारीमुळे आतापर्यंत देशभरात ३०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. मृतांमध्ये १६२ डॉक्टर, १०७ परिचारिका आणि ४४ आशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सरकारने मंगळवारी संसदेत दिली.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी सरकारने कोरोनामुळे दगावलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आकडेवारीच नसल्याचे सांगितले होते. यामुळे सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी कोरोनामुळे दगावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसंदर्भात माहिती दिली.

२२ जानेवारीपर्यंत राज्यांनी पाठवलेल्या आकडेवारीनुसार ३०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे चौबे यांनी सांगितले. भारतीय वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेल्या मृतांच्या आकड्याची दखल घेण्यात आली आहे का ? तसेच त्याची पडताळणी करण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले आहेत?

असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना चौबे म्हणाले की, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी : विमा योजना) अंतर्गत विमा रकमेच्या वितरणाच्या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार कोरोनामुळे प्राण गमविणाऱ्या व्यक्तीच्या सत्यापनाची जबाबदारी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या संबंधित प्राधिकरणाकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button