विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवले, कंपन्यांवर कारवाईची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाल्याच्या पाच वर्षांनंतरदेखील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याचा दावा काँग्रेस खासदार राजामणी पटेल यांनी केला.

पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुबाडून त्यांची फसवणूक करत असल्याचा पटेल यांचा आरोप आहे. राज्यसभेत बुधवारी शून्य प्रहरात बोलताना काँग्रेस खासदाराने पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला.

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मात्र चार-चार वर्षे उलटून गेली तरी विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास तयार नाहीत.

शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळत नसेल तर हे दुर्दैवी आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, असे पटेल म्हणाले.

शेतकऱ्यांना लुबाडून त्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी नोकरशाहीचा मुद्दा उपस्थित करत यंत्रणेत अधिक पारदर्शकपणा आणण्याची मागणी केली.

सरकारी धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची असते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांवर कामाचा फार दबाव असतो. याचा फटका सरकारच्या कामकाजाला बसतो. त्यामुळे भारतीय नागरी सेवेची पुनर्रचना करून सरकारी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे फौजिया खान म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button