संपूर्ण देशभर उद्या ‘चक्का जाम’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शांततेत आंदोलन केल्यानंतर आता आंदोलक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

उद्या 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्ली सोडून संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.

या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली वगळून उद्या देशभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर हे आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांची शेतकरीच काळजी घेणार आहेत.

वाहतूक कोंडीत अडकलेल्यांसाठी मोफत जेवण आणि पाणी देण्याची व्यवस्था शेतकरी करणार आहेत. दरम्यान या चक्क जाम आंदोलनाविषयी बोलताना टिकैत म्हणाले,

हे चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांसाठी शेतकरी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करतील. हे आंदोलन तीन तास चालेल. हे आंदोलन आम्ही दिल्लीत करणार नाही. मात्र, दिल्लीच्या बाहेर सर्वत्र हे आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना अन्न पाणी देण्यात येईल. आमच्या बरोबर सरकार काय करत आहे, ते आम्ही जनतेला सांगू. दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे.

सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे असा आरोप आंदोलक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button