स्वतःचे अपयश लपवण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलं असावे’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फडणवीस यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचे समर्थन करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारबद्ल फडणवीस असे वक्तव्य करत आहेत.

केंद्रसरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल १०० रुपये लिटर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नये,” असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी वीज दराबाबतही भाष्य केले.

वीज दराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शेतकऱ्यांची ४५ हजार कोटीची थकबाकी होती, त्यातील केवळ १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत.

३० हजार कोटी रुपये माफ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. वीज कंपन्या अडचणीत असतानाही ३० हजार कोटी रुपये माफ करून अडचणीत असलेल्या जनतेला राज्य सरकारने आधार दिला असल्याचे ते म्हणाले.

“पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात असते हे आपल्या देशातील लोकांना माहित आहे. त्यामुळे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी असे वक्तव्य केले असणार,” अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

“सेलिब्रेटींनी काय ट्विट् करावे हा त्यांचा अधिकार आहे. उलट एवढे आंदोलन पेटलेले असतानाही केंद्रसरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही दिले नाही,” असा आरोपही अजित पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button