पैशांची वसुली होत नसल्यान भिशी चालकाने उचलले धक्कादायक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-संगमनेर मध्ये कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे. एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य नागरीकांपासून मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत यात सहभागी आहेत.

5 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत भिशी लावण्यात येत आहे. दरम्यान भिशीच्या या व्यवहारातून अनेक भिशीचालक मालामाल झाले आहेत. मात्र दुसरीकडे याच बेकायदेशीर भिशी व्यवसायामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत.

भिशीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये वसूल होत नसल्याने त्रस्त झालेल्या शहरातील सय्यदबाबा चौकातील एका भिशीचालकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सय्यदबाबा चौकात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संगमनेर शहरात कोट्यवधी रुपयांच्या भिशी सुुरू आहेत.

या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने शहरात हा व्यवसाय चांगलाच फोपावला आहे.दरम्यान भिशी व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो असा धोका वर्तविला होता. भिशी व्यवसायात अनेक प्रतिष्ठीत अडकलेले आहेत. त्यांनी या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आहे. मात्र हे पैसे वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

सय्यद बाबा चौकातील एका जुन्या भिशी चालकाचेही मोठ्या प्रमाणात पैसे या व्यवसायात अडकले आहे. या भिशी चालकाची जवळपास 4 कोटी रुपयांची भिशी चालते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भिशीत सहभागी असणार्‍या 14 सदस्यांनी पैसे थकवले आहे. 50 लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम थकलेली आहे.

ही रक्कम मिळावी यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. मात्र रक्कम वसूल होत नव्हती. पैसे मागायला गेल्यानंतर काही सदस्यांनी त्याला दमबाजी केली. या भिशीचालकाला अन्य ठिकाणी मोठी रक्कम द्यावयाची आहे. मात्र भिशीत अडकलेले पैसे वसूल होत नसल्याने तो त्रस्त झाला होता.

पैसे वसूल होत नसल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याने विषारी औषध सेवन केले. त्याला त्वरीत खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचा धोका टळलेला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता आपल्याला याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तक्रार अर्ज आल्यास कारवाई करु असे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी सांगितले.

Back to top button