डॉनबॉस्को विद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉन बॉस्को विद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालया समोर घंटानाद आंदोलन केले.

या आंदोलनात पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, मोहन ठोंबे आदी सहभागी झाले होते. सदर प्रकरणाची दखल घेत राज्य मानव अधिकार आयोगाने तक्रार दाखल करुन देखील पोलीसांनी या प्रकरणी अद्यापि गुन्हा दाखल केलेला नाही.

सावेडी येथील डॉनबॉस्को विद्यालयाने 17 जानेवारी 2019 रोजी शिक्षण विभागाच्या परवानगीविना खाजगी बसणे (लक्झरी) वसई विरार येथे बेकायदेशीर सहल नेली होती. या प्रवासामध्ये आळेफाटा (जि. पुणे) परिसरात सदर बसचा अपघात होऊन त्यामध्ये या शाळेचा एक शिक्षक, लक्झरी बसचा क्लिनर, अपघात ग्रस्त टेम्पोचा ड्रायव्हर अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर या अपघातामध्ये 22 ते 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.

शिक्षण विभागाची परवानगी न घेता खाजगी लक्झरी बसने शालेय विद्यार्थ्यांची सहल काढणे, सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर कृत्य होते. हा ठपका ठेवत शिक्षण विभागाने चौकशीमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक आणि इतरांना दोषी ठरवले आहे. मात्र सदर संस्थेने अथवा शिक्षण विभागाने सदर मुख्याध्यापक व इतर दोषी व्यक्तीवर या अपघाताची गंभीरता लक्षात न घेता कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

तीन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले व 22 ते 25 विद्यार्थ्यांना गंभीर इजा पोहचविणारी घटना गंभीर स्वरुपाची आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, सहल प्रमुख व या घटनेशी संबंधीतांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी निवेदन स्विकारुन नियमानुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.