शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सुरूच; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- शहरासह जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असून, या गुन्ह्यांतील टोळ्या पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना चेन स्नॅचिंगच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

नुकतेच शहरातील समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यालगत स्कुटी चालविण्याचा सराव करत होत्या.

याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या पाठीमागे पल्सर दुचाकीद्वारे येऊन गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चोरट्यांना ते गंठण हाती लागले नसल्याने त्यांनी तिथून धूम ठोकली दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरून जात असलेल्या महिला, रस्त्याने पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या टोळ्या जिल्ह्याभरात कार्यरत आहेत.

पल्सरसारख्या गाडीवरून चोरटे येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून पसार होत आहेत. मध्यंतरी या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती केली होती. तसेच या घटना सकाळी व सायंकाळी घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढविल्यानंतर हे प्रकार बंद होतात.

Back to top button