निरंकारी मंडळातर्फे बाबा हरदेव सिंहजी जन्मदिवस वृक्षारोपणाने साजरा

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या 67 व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे दि.21 ते 23 फेब्रुवारी 2021 दरम्यान देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले.

यावेळी प्रत्येक निरंकारी परिवाराने जास्तीत जास्त रोपे लावून त्याचे तीन वर्षांपर्यंत संगोपन व संरक्षण करावे, हा अभियानाचा उद्देश असून, बाबा हरदेव सिंहजी महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण साकार करावे, असे आवाहन करण्यात आले.

विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने संत निरंकारी मंडळाच्या नगर शाखेच्या वतीने मिस्कीन रोड, गुलमोहोर रोड, सावेडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. निरंकारी सेवा दलचे क्षेत्रीय संचालक आनंद कृष्णानी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी निरंकारी सेवादलच्या महिला व पुरुष सदस्य तसेच सत्संग सदस्य, अबालवृद्ध उत्साहात या अभियानात सहभागी झाले होते.

यावेळी निरंकारी भवन परिसरात ज्येष्ठ नागरिक सिंगासनी देवी यांच्या हस्ते व गुलमोहोर रोड परिसरात ज्येष्ठ महिला निर्मलादेवी टकले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्याचबरोबर जिल्ह्यातही निरंकारी भक्तांनी आपआपल्या भागात वृक्षारोपण केले. यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन व सेवा दल च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Back to top button