आमदार राजळे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये १७ उमेदवार बिनविरोध झाले तर चार उमेदवारांसाठी निवडणूक झाली.

जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकेला मोठे महत्त्व असून, या बँकेच्या उपाध्यक्षपदी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे.

जिल्हा सहकारी बँकेमध्ये मागील पंचवार्षिकला लोकनेते स्व.राजीव राजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी आमदार मोनिकाताई राजळे यांना संचालक म्हणून काही दिवस काम करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये आमदार राजळे यांनी देखील राजकीय हातखंडे वापरत बँकेवर बिनविरोध निवडून जाण्याचे राजकीय कसब अगदी पद्धतशीर पार पाडले.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची देखील निवडणूक बिनविरोध पार पाडल्याने सहकार क्षेत्रातील कामाचा देखील चांगला सूर आमदार राजळे यांना गवसला असून,

सहकारात देखील आमदार राजळे यांनी चांगलेच वर्चस्व निर्माण केले असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमध्ये काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

तसेच शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री शंकरराव गडाख या मंत्रीद्वियांच्या आमदार राजळे जवळच्या नातेवाईक असल्याने आमदार राजळे यांना

जिल्हा बँकेच्या माध्यमातून अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद देऊन त्यांना या सहकार क्षेत्रात सोबत घेऊन जाण्याची सकारात्मक भूमिका या दोन्ही मंत्री महोदयांची राहील असे वाटते.

परंतु जिल्हा बँकेत महा विकास आघाडीचेच वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपच्या आमदार राजळे यांना अध्यक्षपद मिळेल असं वाटत नसल्याने त्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावून भाजपा नेत्यांना सोबत घेऊन बँकेची ही सहमती एक्सप्रेस पुढे जाईल असे वाटते.