This Website Is Part Of TBS Media Group
अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रात्री ११ ते सकाळी ५ यावेळेत मोबाईल, लॅपटॉप या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची माहिती मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयानुसार, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे.
रेल्वेचा हा निर्णय नवीन नाहीये, यापूर्वी 2014 मध्ये बंगळुरु-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये आगीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे मंडळाने सर्व झोनला रात्री ११ ते पहाटे पाच दरम्यान चार्जिंग्ज बंद करण्याची शिफारस केली होती.
त्याची अंमलबजावणी आता होत असून रेल्वे बोर्डने आता सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. “नुकत्याच झालेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीही रेल्वे बोर्डाने असे आदेश जारी केले होते.
मुख्य स्विचबोर्डवरुन रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत चार्जिंग पॉईंट्सची वीज बंद ठेवली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|