अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बोगस कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरात क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरने सुरू केलेल्या बेकायदेशिर कोव्हिड केअर सेंटरचा तहसिलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी पर्दाफाश केला.

शहरातील प्रत्येक नागरीकाची रॅपिड चाचणी करून रूग्ण वाढीस आळा घालण्यासबंधीची मोहिम गुरूवारपासून पारनेर शहरात हाती घेण्यात आली आहे.

तहसिलदार ज्योती देवरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, यांच्यासह इतर कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

या मोहिमेअंतर्गत तपासणी सुुरू असताना बाजार पेठेमधील डॉ. रोहित गांधी यांच्या क्लिनिकमध्ये २० बेड टाकण्यात येउन तेथे उपचार करण्यात येत होते.

तहसिलदार ज्योती देवरे यांनी रूग्णांची चौकशी केली असता डॉ. गांधी यांचा बनाव उघड झाला. त्या रूग्णांची तपासणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याची माहीती उघड झाली.

त्याचे समर्पक उत्तर डॉ. गांधी हे देउ शकले नाहीत. तहसिलदार देवरे यांनीं अधिक चौकशी केली असताना रूग्णालय सुरू करण्यासंदर्भातील नोंदणीही डॉ. गांधी यांनी केली नसल्याची गंभीर बाब पुढे आली.

कोव्हिड रूग्णालय सुरू केल्यानंतर तेथे दाखल होणाऱ्या रूग्णांची माहीती प्रशासनास देणे बंधनकारक असते. मात्र डॉ. गांधी यांनी प्रशासनास कोणत्याही प्रकारची माहीती दिलेली नव्हती.

दाखल असलेल्या रूग्णांना शासन मान्यताप्राप्त कोव्हिड सेंटरला हालविण्यात येऊन पोलिस प्रशासनाने डॉ. गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिलदार देवरे यांनी दिले.

पारनेर शहरातच बोगस कोव्हिड सेंटर आढळून आल्याने कोरोना रूग्णांची लुट करण्याचे लोण पारनेर शहरातही पोहचल्याचे उघड झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|