कोरोना टेस्ट पडली माहागात : सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक !

file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- तेलंगणाच्या करीमनगरमधील रामदुगु मंडळातील व्यंकटरोपल्ली या गावचे सरपंच जुवाजी शेखर कोरोना चाचणी करण्यासाठी गेले होते. मात्र, स्वॅब स्टिक त्यांच्या नाकामध्येच तुटली.

यानंतर एंडोस्कोपीच्या माध्यमातून ही स्टिक बाहेर काढावी लागली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. गावात रॅपिड अँटिजन टेस्ट करुन घेण्यासाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता.

गावकऱ्यांच्या मनात याबाबत असणारा गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी सरपंचांनी आधी स्वतः चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्यांच्यासाठी हे चिंतेचं कारण ठरलं. जुवाजी शेखर स्थानिक गोपालरावपेट प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये रॅपिड टेस्टसाठी गेले. मात्र, सॅम्पल घेण्यासाठी त्यांच्या नाकात स्वॅब स्टिक घालताच ती तुटली.

काहीच वेळात वेदना वाढू लागल्या. सुरुवातीला डॉक्टर आणि नर्सनं त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही.

अखेर जुवाजी शेखर करीमनगरमधील एका खासगी रुग्णालयात गेले आणि एंडोस्कोपी करुन ही स्वॅब स्टिक काढण्यात आली. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की ही स्वॅब स्टिक नाकावाटे त्यांच्या गळ्यामध्ये जाऊन अडकली होती.