संग्राम कांडेकरने घेतला बापाच्या हत्येचा बदला :राजाराम शेळके हत्याकांडाचे गुढ उकलले !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याच्या हत्येचे गुढ उकलले असून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम कांडेकर याने वडीलांच्या हत्येचा बदला घेतला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे एकट्या संग्राम यानेच तलवारीने सपासप वार करीत राजाराम यास जागीच ठार केल्याची कबुली त्याने शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाजवळ दिली आहे. राजकीय वर्चस्व, आपसातील भांडणांच्या कारणावरून नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके याने भाडोत्री शार्प शुटरकडून तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती.

याप्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहूल तसेच इतर तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभुमिवर राजारामसह इतर आरोपींना न्यायायलाने पॅरोल रजा मंजुर केली असून वर्षभरापासून राजाराम नाराणगव्हाण येथील त्याच्या शेतामध्ये वास्तव्यास होता.

राजाराम शेळके याने वडीलांचा खुन केल्याची सल प्रकाश कांडेकर यांचा मुलगा संग्राम याच्या मनात होती. राजाराम सुटीवर आल्यानंतर त्याचा काटा काढण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने एक धारदार तलवार उपलब्ध करून ठेवली होती.

घटना घडण्यापूर्वी तिन ते चार दिवस संग्राम राजाराम याच्या मागावर होता. राजारामच्या शेताशेजारील उसामध्ये लपून बसून तो एकटा सापडण्याची संग्राम संधी शोधत होता. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजाराम शेतामधील शेततळयाचे काम करणाऱ्या मजुरांना सुचना देऊन एकटाच परतत होता.

तिच संधी साधत संग्राम याने पाठीमागून येत राजारामच्या मानेवर तलवारीचा जोरदार प्रहार केेला. एकाच प्रहारामध्ये राजाराम जमीनीवर कोसळला. तो कोसळल्यानंतर संग्राम याने त्याच्या मानेवर आणखी दोन वार करून तो पुन्हा उसामध्ये जाउन लपला.

पहिल्याच वारमध्ये राजाराम गतप्राण झाला. वार झाल्यानंतर राजाराम याच्या तोंडातून शब्द देखील फुटला नाही. संग्राम यानेच ही माहिती पोलिसांना दिली. संग्राम याने अंगावर दोन टी शर्ट परिधान केले होते. हत्येनंतर वरचा टी शर्ट काढून त्याने उसामध्ये फेकून दिला. जवळील तलवार पुन्हा सोबत घेउन त्याने ती घराजवळील डेअरीमध्ये ठेउन दिली.

वडीलांच्या हत्येचा बदला घेतल्यानंतर शांत झालेला संग्राम दुचाकीवरून शिरूर येथे गेला. एटीएममधून पाचशे रूपये काढून त्याने पानाचा अस्वाद घेतला. त्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संग्राम यास अटक केली.