अकोले तालुक्यात नेटवर्क नसल्याने पुलाखाली ऑनलाइन भरते शाळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-  अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपसंडी गावातील तेरा वर्षांच्या तुषार मुठेची गावात मोबाइल नेटवर्क नाही.

त्यामुळे गावापासून आठ किलोमीटर दूर असलेल्या पुलाखाली दररोज तुषार मुळे या विद्यार्थ्याची ऑनलाइन शाळा भरते. परिसरात हिंस्त्र जनावरे असल्याने येथे पालकांना पहारा द्यावा लागतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शाळेचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. हे चित्र आहे अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील.

तेरा वर्षांचा तुषार दत्तू मुठे हा सातवीत आदिवासी शासकीय योजनेतून तालुक्यातील वीरगावच्या आनंद दिघे इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे.

गावात नेटवर्क त्यामुळे अभ्यास कसा करायचा, हा प्रश्न तुषार समोर होता. त्याला वडिलांनी मजुरी करून लॅपटॉप घेऊन दिला. पण, गावात इंटरनेटसाठी नेटवर्क नाही.

तुषारने ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिले. तुषार गावापासून आठ किलोमीटर दूर सातेवाडी परिसरातील एका दरीत डांबरी रस्त्याच्या छोट्या पुलाखालील जागेत रेंज येत असल्याने दररोज सकाळी आठ ते बारापर्यंत लॅपटॉपवर शिक्षण घेतो.

आसपासच्या परिसरात रानडुकरे, तरस, बिबटे असे प्राणी असल्याने पालकांना शाळा संपेपर्यंत पहारा द्यावा लागतो. फोपसंडी अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम गाव.

येथे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यामुळे वीज आली व रस्ता झाला. सध्या या गावाच्या दहा चौरस किलोमीटर क्षेत्रात इंटरनेट नेटवर्क नाही.