ऐन दिवाळीत नगर बाजार समिती निवडणुकीचा बार उडणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर बाजार समितीची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत संपत असल्याने ऐन दिवाळीत निवडणुकीचा बार उडणार आहे.

नगर बाजार समिती जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असल्याने या समितीच्या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व असते. मात्र कोरोनाची तिसरी लाट गंभीर असल्यास निवडणुकीला मुदतवाढ मिळणार असल्याचे शासकीय सूत्रांकडून समजले.

नगर बाजार समितीची १३ नोव्हेंबर २०१६ रोजी मागील निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. मात्र बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ३ डिसेंबर रोजी संपत आहे. यापूर्वी निवडणुका घेण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने ऐन दिवाळीतच बाजार समितीच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.

तथापि, सध्या कोरोना संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे मागील वर्षी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे निवडणुकांचे भवितव्य कोरोना संसर्गावर अवलंबून आहे. तिसरी लाट किती गंभीर आहे. यावर नगर बाजार समितीच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

मात्र असे असले तरी बाजार समितीच्या प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून बाजार समिती प्रशासनाने मतदार याद्याची जुळवाजुळव सुरू केली असून तालुका उपनिबंधकांना पत्र पाठवून सेवा संस्था मतदारांची नावे कळविण्याचे पत्र दिले आहे.