संगमनेरातील 36 कैद्यांची रवानगी अन्य कारागृहात होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- संगमनेर कारागृहातील एकूण 65 कैद्यांपैकी 21 जणांची येरवडा तर 15 जणांची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात येणार असून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान कैद्यांची संख्या अधिक झाल्याने येणाऱ्या अडचणी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी नवीन कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहात पुरुष कैद्यांसाठी तीन तर महिला कैद्यांसाठी एक अशा चार बराकी आहेत.

या कारागृहाची क्षमता 24 कैदी ठेवण्याची आहे. मात्र अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक कैदी या कारागृहात ठेवलेले असतात. सध्या या कारागृहामध्ये विविध गुन्ह्यांमधील एकूण 65 कैदी शिक्षा भोगत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरल्याने अनेक समस्या तयार झाल्या आहेत.

या कारागृहामध्ये गेल्या काही दिवसांपासून रॅगिंगचा प्रकार सुरू झाला आहे. जुन्या कैद्यांकडून नव्या कैद्यांना मारहाण त्याचबरोबर बंदोबस्तावर असलेल्या कर्मचार्‍यांना कैदी त्रास देत असतात. कारागृहात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

यामुळे कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखूच्या पुढ्या सहज उपलब्ध होतात. पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीतील आरोपी या कारागृहात ठेवलेले असतात. न्यायालयीन कोठडीतील कैद्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे संगमनेरच्या तुरुंगाचे वातावरण खराब झालेले आहे.

कारागृह अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळेच संगमनेरच्या कारागृहात गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच इथला सगळाच भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढू लागला व याची चर्चा देखील होऊ लागल्याने अखेर प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर या कैद्यांची रवानगी अन्य कारागृहात करण्यात येणार आहे.