त्याच्या भीतीने नागरिक अंधार पडण्यापूर्वीच घरी परतु लागले

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरू लागली आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये बिबट्याची दहशत कायम असून आता ती वाढू लागली आहे.

रात्रीच्या अंधारात आढळून येणार बिबट्या आता दिवसाढवळ्या दिसून येऊ लागला आहे. बिबट्याच्या धास्तीने शेतातील कामे करण्यास शेतकरी आणि शेतमजूर धीर धरत नाही. बिबट्याच्या धास्तीने अनेक शेतकर्यांची शेतीकामे थांबली आहेत.

यामुळे नागरिक देखील चांगलेच दहशतीखाली वावरू लागले आहे. राहाता तालुक्यातील डो-हाळे गांवात दिवसा ढवळ्या बिबट्या मुक्त संचार करतांना आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरीकांमध्ये दहशतीचे पसरली आहे.

दरम्यान वनविभागाने सापळा रचून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बिबट्या आल्याची माहिती मिळताच गावातील दुध उत्पादक शेतकरी व कामगार मंडळींनी अंधार होण्याअगोदर आपले घर गाठून छोटीमोठी जनावरे गोठ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे.

दरम्यान डो-हाळे गावातील काराला येथील परीसरात काही तरुणांना या बिबट्याने दर्शन दिले.यावेळी संबंधित तरुणांनी आपले चारचाकी वाहन उभे करून चक्क पाच ते सहा मिनिटे मोबाईलवर बिबट्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले

आणी तातडीने सोशल मीडियावर व्हायरल केले. बिबट्याच्या दहशतीतून नागरिकांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी परिसरात पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.