बारावीच्या निकालाबाबत गुरुजींनी शिक्षणमंत्र्यांकडे केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  दहावीचा निकाल तर झाला आता सर्वाना उत्सुकता आहे ती म्हणजे बारावीचा निकाल कधी लागणार याकडे…

बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे.

बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 16 जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशाच्या सीईटीची तारीख जाहीर केली आहे. आता, सर्वांना बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र शासनाने बारावीच्या शिक्षकांना 21 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे.

परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक मुकुंद आंधळकर यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शिक्षकांच्या मागणीवर काय निर्णय घेतात, हे पाहावं लागणार आहे.