शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव यावर्षी असा होणार साजरा ! जाणून घ्या सविस्तर माहिती…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे गुरुवारपासून (दि. 22) गुरुपौर्णिमा उत्सव सुरू होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीचा उत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.

पवित्र नगरीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला साईबाबा संस्थानच्या वतीने अगदी साध्या पध्दतीने भक्तांंविना प्रारंभ होत आहे.कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने अद्यापही साईमंदीर सुरू करण्यासाठी परवानगी दिली नाही.

मागील वर्षी देखील करोनामुळे साईमंदीर बंद होते तेव्हाही अशाप्रकारे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला होता. साईबाबा संस्थानच्या वर्षातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला जगभरातील भाविक साईदरबारी हजेरी लावतात.

मात्र कोविडमुळे दोन उत्सवाला करोडो भाविकांसह शिर्डीकरांना मुकावे लागले असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे कान्हूराज बगाटे म्हणाले, ‘गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे साईबाबांचे समाधिमंदिर बंद करण्यात आले होते.

त्यानंतर 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासनआदेशान्वये 16 नोव्हेंबर 2020पासून साईबाबांचे समाधिमंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी-शर्तींवर खुले करण्यात आले होते. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,

राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणे आदी ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 5 एप्रिल 2021 रोजीपासून श्री साईबाबा समाधिमंदिर दर्शनाकरिता साईभक्तांना बंद ठेण्यात आलेले आहे.

त्यामुळे 22 ते 24 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणारा गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी (गुरुवार) पहाटे 4.30 वाजता ‘श्रीं’ची काकड आरती, 5 वाजता ‘श्रीं’च्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 5.15 वाजता द्वारकामाई मंदिरात ‘श्री साईसच्चरिता’चे अखंड पारायण,

5.30 वाजता ‘श्रीं’चे मंगलस्नान, सकाळी 6.00 वाजता ‘श्रीं’ची पाद्यपूजा, दुपारी 12.30 वाजता ‘श्रीं’ची मध्यान्ह आरती व दुपारी 4 ते 6 या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता ‘श्रीं’ची धूपारती होईल.

रात्री 10.30 वाजता ‘श्रीं’ची शेजारती होईल. या दिवशी ‘श्री साईसच्चरित’च्या अखंड पारायणाकरिता द्वारकामाई मंदिर आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात येईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी (शुक्रवारी) पहाटे 4.30 वाजता ‘श्रीं’ची काकड आरती, 5 वाजता अखंड पारायणसमाप्ती व ‘श्रीं’च्या फोटोची व पोथीची मिरवणूक,

5.20 वाजता ‘श्रीं’चे मंगलस्नान, सकाळी 6 वाजता ‘श्रीं’ची पाद्यपूजा, दुपारी 12.30 वाजता ‘श्रीं’ची मध्यान्ह आरती व दुपारी 4 ते 6 या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी 7 वाजता ‘श्रीं’ची धूपारती होईल. रात्री 10.30 वाजता ‘श्रीं’ची शेजारती होईल. उत्सवाच्या सांगतादिनी (शनिवारी) पहाटे 4.30 वाजता ‘श्रीं’ची काकड आरती होईल.

सकाळी 5 वाजता ‘श्रीं’चे मंगलस्नान, सकाळी 6.30 वाजता ‘श्रीं’ची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून, सकाळी 10 वाजता गोपालकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता ‘श्रीं’ची मध्यान्ह आरती होणार असून, सायंकाळी 7 वाजता ‘श्रीं’ची धूपारती होईल. रात्री 10.30 वाजता ‘श्रीं’ची शेजारती होईल.