फरार आरोपीचा पाहुणचार करण्यासाठी घरी पोहचले पोलीस…

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रकरणातील फरार आरोपी त्याच्याच एका पाहुण्यांच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी गेला होता.

त्याचा पाहुणचार सुरु होताच तोच त्याठिकाणी पोहचला पाेलिसांचा ताफा आणि काय आरोपीचे जेवण राहिले बाजूलाच तोच पोलिसांनी आरोपीच्या हाती बेड्या ठोकल्या.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील सरस्वती निवृत्ती दरेकर या वृद्ध महिलेचे घर तिघांनी पाडले होते.

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. हे तीनही आरोपी फरार होते. कौठा शिवारातील म्हसोबावाडी येथील पाहुण्यांकडे हे तीन आरोपी पाहुणचार घेण्यासाठी आले होते.

पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन काढले. त्यानुसार म्हसोबावाडी शिवारात आरोपींचे लोकेशन निघाले. पोलीस उपनिरीक्षक रणजीत व पोलीस काॅन्स्टेबल वैराळ यांनी छापा टाकून, भानुदास लक्ष्मण दरेकर, तुळशीराम लक्ष्मण दरेकर व लक्ष्मण भिकाजी दरेकर या आरोपींना अटक केली.

फरार आरोपींना सहारा दिल्याप्रकरणी पोलिसांनी म्हसोबावाडीतील त्या पाहुण्याला पोलीस स्टेशनला हजर होण्याबाबात नोटीस बजावली आहे. वरील आरोपींना श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली.