जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ; धरणांच्या पाणीपातळीत झाली वाढ

file photo

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पावसाचा जोर नसल्याने भंडारदरा व मुळा या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती.

पण गत तीन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाचही धरणांत पाण्याची आवक वाढली आहे.

दरम्यान भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. गत 12 तासांत 192 दलघफू पाणी दाखल झाले. या धरणातील पाणीसाठा 5275 दलघफू झाला आहे.

पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास आज बुधवारी या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर जाण्याची शक्यता आहे. तसेच 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणातील पाणीसाठा 1500 दलघफू होता.

102 दलघफू क्षमतेचे वाकी तलावातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर पोहचला आहे. आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणात हळूवारपणे नवीन पाण्याची आवक होत आहे. दरम्यान मुळा नदीतील पाणीपातळी सकाळी 3212 क्युसेक होती. दुपारनंतर त्यात वाढ होत 5000 क्युसेकच्या पुढे गेली होती.

मात्र धरणात पाणी येण्यास उशीर लागत असल्याने सायंकाळी धरणात 2568 क्युसेकने आवक सुरू होती. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी 10401 दलघफू पाणीसाठा होता.