‘तो’ बंद कारखाना सुजय विखेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू व्हावा

file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आता अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपले आहेत. त्यासाठी अनेक कारखान्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. मात्र, राहुरी तालुक्यातील डॉ.तनपुरे कारखाना कधी चालू होणार याकडे शेतकरी व कामगारांचे लक्ष लागून आहे.

डॉ.तनपुरे साखर कारखाना खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली सुरु व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी तांत्रिक कारणामुळे या कारखान्याचा गळीत हंगाम उशिराने सुरू झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचा ऊस गाळपाविना पडून राहून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यंदाही गाळप वेळेवर सुरू होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 12 लाख टन ऊस गाळपाच्या प्रतिक्षेत उभा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातही उसाचे प्रमाण वाढलेले आहे.

त्यामुळे राहुरीच्या उसाला बाहेरील कारखान्यांकडून मागणी अगदीच कमी राहणार आहे. पर्यायाने डॉ. तनपुरे कारखाना सुरू झाला तरच शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप होणार आहे. अन्यथा तालुक्यातील अनेक ठिकाणी गाळपाविना ऊस शिल्लक राहण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

यंदा हा कारखाना सुरू होण्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. यावर्षी कारखाना चालू झाला तरच तो पुढे चालू राहणार आहे. अन्यथा शेतकर्‍यांचे व पर्यायाने राहुरी तालक्याच्या बाजारपेठेसह कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे.

दरम्यान, डॉ.तनपुरे साखर कारखाना सुरू करण्याची मागणी कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ. सुजय विखे यांच्याकडे केली आहे. खा. डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.