वाट दिसू दे ग देवा, वाट दिसू दे… निकृष्ठ रस्त्यामुळे गावकऱ्यांची प्रशासनाला हाक

file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात आजही अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर तेथील वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांची परिस्थिती व त्यांच्या समस्या लगेच जाणवू लागतात.

मात्र हीच परिस्थिती पाहून देखील प्रशासनाकडून यावर उपाययोजना करण्यास विलंब लावला जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशीच काहीशी अवस्था रहुरी तालुक्यात झालेली पाहायला मिळाली आहे.

राहुरी तालुक्यातील चांदेगाव-ब्राम्हणगाव या दोन्ही गावातील म्हसेवस्ती ते मुसमाडे वस्ती शिव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याचे तातडीने खडीकरण करेन डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहने चालविणे मुष्कील झाले आहे. स्त्याच्या दुरावस्थेमुळे तेथील वाड्या वस्त्यांवरील रहिवाशी नागरीकांची जाण्या येण्याची मोठी गैरसोय होत आहे.

या परिसरातील शेतकर्‍यांनी यापुर्वी दोन वेळा लोकवर्गणी करून रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी केली. परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही. रस्त्याची पुन्हा तीच परिस्थिती झाली आहे.

प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करून तातडीने दुरूस्ती करावी, अन्यथा रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.