अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- राज्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे 215 गुन्हे दाखल झाल्याची माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने ऑपरेशन ब्लॅकफेस अंतर्गत डिसेंबर 2019 आतापर्यंत स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असून त्यात 105 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोर्नोग्राफीचे 15 हजारांहून अधिक फोटो अपलोड :-लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत. इंटरनेटवर चाईल्ड पोर्नोग्राफीची 15 हजारांहून अधिक फोटो व लिंक अपलोड केल्याची माहिती सायबर विभागाला प्राप्त झाली आहे.

७३ टक्के लिंक शहरातून :- नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोयटेड चिर्ल्डन (एनसीएमईसी) या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाला (एनसीआरबी) इंटरनेटवरील अशा वायरल संदेश व व्हिडिओंची माहिती देते.

त्यानुसार ही माहिती प्रत्येक राज्यातील नोडल संस्थांना पाठवण्यात येते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातून डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या 15 हजार 255 लिंक अपलोड करण्यात आल्या आहेत.

त्यातील बहुतांश म्हणजे 73 टक्के लिंक(11 हजार 11 लिंक) या मोठ्या शहरांमधून अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईत 4496 व पुण्यातून 5699 लिंक अपलोड झाल्या आहेत.

50 जणांना अटक :- ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद व सोलापूर येथून अपलोड करण्यात आल्या आहेत. याशिवाय जळगाव, ठाणे ग्रामीण, पालघर व कोल्हापूर येथून सुमारे 30 चाईल्ड पोर्नोग्राफीच्या लिंक अपलोड झाल्या आहेत.

या वर्षी राज्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीचे 25 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सुमारे 50 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र सायबर विभागाकडून ऑपरेशन ब्लॅकफेस चालू असून त्या अंतर्गत आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीत मुंबईतून चार हजारांहून अधिक लिंक :- मुंबई व नागपूर परिसरात कोरोनामुळे स्थिती गंभीर झाली होती. अशा परिस्थिततही मुंबईतून टाळेबंदीच्या काळात चार हजारांहून अधिक चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या लिंक इंटरनेटवर अपलोड झाल्या आहेत. त्यातील त्यातील केवळ 11 प्रकरणांमध्येच गुन्हा दाखल झाला आहे.

त्यात तिघांना अटक झाली आहे. मुंबईत पोलिसांना कोरोनाची मोठी झळ पोहोचली होती. त्यांचे अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले होते.

त्यामुळे संख्य़ाबळ कमी असल्यामुळे मुंबईत कमी कारवाई झाल्याचे एका अधिका-याने सांगितले. त्याच्यापोठोपाठ नागपूर येथे 308 प्रकरणांमध्ये 38 गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यातही 16 गुन्ह्यामध्ये 9 जणांना अटक झाली आहे.