लेखक – हेरंब कुलकर्णी :- अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक झाली. एकूण २१ संचालकांपैकी १३ संचालक हे आमदार, माजी आमदार किंवा आमदारांच्या कुटुंबीयांपैकी आहेत म्हणजे ६२ टक्के प्रतिनिधी हे आमदार कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ही बँक आमदारांच्या कुटुंबियांसाठी राखीव आहे काय असा प्रश्न पडतो…
सहकाराला गती देताना तळागाळातल्या माणसांचे आर्थिक सक्षमीकरण व त्याच वेळी सामान्य कुटुंबियांतील नेतृत्व पुढे यावे असा विचार होता. त्यातून सत्तेचे विकेंद्रीकरण होईल यादृष्टीने राजकीय नेतृत्व घडवणारी ही कार्यशाळा आहे असाही विचार होता पण सहकारी साखर कारखाने जिल्हा बँका येथील राजकारण बघता तो हेतु पूर्णपणे फसला आहे असेच म्हणावे लागेल खरेतर आमदार कुटुंबीयांना राज्य स्तरावरील नेतृत्वाची संधी मिळत असल्यामुळे त्यांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कारखाने व बँकांमध्ये पुढे आणायला हवे.
त्यातून जिल्ह्यात नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी निर्माण होऊ शकेल परंतु आज आमदार यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्यही संचालक झालेले दिसतात. त्यामुळे एकाच कुटुंबाभोवती सत्ता फिरत राहिल्याने जिल्ह्यातील राजकीय सरंजामदारी वाढते आहे व राजकीय नेतृत्व गरीब बहुजन कुटुंबातील तरुणांमधून पुढे येत नाही असे दुर्दैवाने घडते आहे विधानसभा २०१९ची निवडणूक झाल्यावर मी पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील २० जिल्ह्यातील सर्व लोकसभा विधानसभा जिल्हापरिषद व कारखाने यांचा अभ्यास केला होता व त्याचा अहवालही प्रसिद्ध केला होता.
त्यात विधानसभेच्या ११६ मतदारसंघात ९४ उमेदवार घराणेशाहीचे, लोकसभेच्या २० मतदारसंघात१९ उमेदवार घराणेशाहीचे,२० जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पैकी १५ घराणेशाहीचे आणि या २० जिल्ह्यातील १९९ साखर कारखान्यांपैकी ९९ चेअरमन घराणेशाहीचे होते..* . नगरसह सर्वच पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यात लोकसभा-विधानसभा जिल्हा परिषद व साखर कारखान्यात घराणेशाहीची पकड अधिक मजबूत होताना दिसते आहे परंतु दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून हा अभ्यास मांडला तरी नेत्यांचे कार्यकर्ते मात्र आयुष्यभर हातात गुलालाचे पोते घेऊन नेत्यांच्या मिरवणुकीत मग्न आहेत.
त्यामुळे ही घराणेशाहीची कोंडी फुटत नाही त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर तरी किमान प्रत्येक तालुक्यातील त्या त्या पक्षातील दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी आमदारकी तुमच्या घरात असेल तर किमान इतर पदे तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळू द्या असे म्हणून आपला हक्क बजावण्याची गरज आहे प्रत्येक पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनी या घराणेशाहीला आव्हान दिले तरच जिल्ह्यात राजकीय नेतृत्व घडण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकेल अन्यथा पुढील काळात चौथी पिढी ही जिल्हा बँकेत व सहकारी कारखान्यात दिसेल.
लेखक : हेरंब कुलकर्णी (हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. तॆ वैचारिक आणि विशेषतः शिक्षणविषयक लेखन करतात.)
हेरंब कुलकर्णी यांचे फेसबुक प्रोफाईल – Heramb Kulkarni (facebook.com)