अण्णाजी तुम्ही नांदच केलाय थेट…! पट्ठ्याने 20 गुंठ्यात मिरचीच्या पिकातून कमवले तब्बल 5 लाख, अण्णाची सध्या चर्चा जोरात

Ajay Patil
Published:

Successful Farmer: गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकरी बांधव पुरता मेटाकुटीला आला असून शेती नको रे बाबा अशी हाक आता बळीराजा मारू लागला आहे.

मात्र असे असतांना देखील शेती व्यवसायात काळाच्या ओघात जर बदल केला तर त्यातून लाखो रुपयांची कमाई सहज करता येणे शक्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात (Solapur News) देखील असंचं काहीस बघायला मिळत आहे.

जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करत आधुनिक पद्धतीने शेती कसून लाखो रुपये कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत हा अवलिया शेतकरी चर्चेचा विषय ठरत आहे. मौजे उपरी तालुका पंढरपूर येथील रहिवासी शेतकरी अण्णा लोखंडे यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरत नाविन्यपूर्ण प्रयोग करीत मिरचीच्या पिकातून (Chilli Crop) लाखो रुपयाची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे अण्णा यांनी केवळ वीस गुंठे क्षेत्रात मिरची च्या पिकातून पाच लाखांची कमाई केली आहे. यामुळे सध्या अण्णांची सर्वत्र चर्चा बघायला मिळत आहे.खरं पाहता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा उसाच्या शेतीसाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. या जिल्ह्यात ऊस या नगदी पिकाची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जात असून अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे.

मात्र असे असले तरी यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यात मोठा चर्चेचा विषय होता. अतिरिक्त उसामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागला. यामुळे ऊस या नगदी पीकाला पर्यायी पिकाची शोधाशोध शेतकरी बांधव करताना दिसत आहे. याच अनुषंगाने मौजे उपरी येथील प्रयोगशील शेतकरी अण्णा लोखंडे यांनी ऊस पिकाला फाटा देत मिरचीची लागवड (Chilli Farming) करण्याचा निर्णय घेतला.

अण्णा यांनी आपल्या 20 गुंठे शेतजमिनीत मिरचीची लागवड केली असून यातून त्यांना तब्बल पाच लाखांची कमाई झाली आहे.अण्णा यांच्याकडे एकूण दोन एकर शेतजमीन आहे. या दोन एकरापैकी 20 गुंठे शेतजमिनीवर अण्णा भाजीपाला लागवड करतात आणि उर्वरित जमिनीवर उसाची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी अण्णा यांनी वीस गुंठ्यात मिरची या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली. खरे पाहता अण्णा आपल्या शेतात उत्पादित केलेला भाजीपाला स्वतः आपल्या गावातील बस स्टैंड वर विक्री करतात आणि आपल्या परिवाराचा गाडा हाकतात.

या वर्षी त्यांनी मिरचीची लागवड केली सुरुवातीच्या काळात मिरचीला अतिशय कवडीमोल दर मिळत होता. मात्र नंतर मिरचीच्या बाजार भावात चांगली सुधारणा झाली आणि अण्णा यांनी उत्पादित केलेली मिरची 160 रुपये किलो पर्यंत विक्री होऊ लागली. यामुळे भाजीपाला विक्री करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारा एक अल्पभूधारक शेतकरी लखपती झाला आहे.अण्णा यांनी एका मिरची बियाण्याच्या कंपनीच्या माध्यमातून युरोपचा दौरा देखील केला आहे. अण्णा यांनी युरोपमध्ये मिरचीच्या शेतीची माहिती जाणून घेतली असून याचा फायदा त्यांना त्यांच्या शेतीत झाला आहे.

अण्णा यांनी माहिती देताना सांगितले की, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी शिव ग्रामीण या जातीच्या मिरचीची लागवड केली. मिर्चीची लागवड करत असताना सुरुवातीला 5 बाय 6 वर बेड सोडले. त्या बेडवर शेणखत,10:26,18:46 आणि युरिया अशी खते टाकून बेड बुजवून घेतले. त्यानंतर चार दिवस बेडला पाणी देण्यात आले. या भिजलेल्या बेडवर 2×2.5 वर शिवग्रामीण मिर्चीची लागवड करण्यात आली.

अण्णा यांच्या मते शिवग्रामीण ही मिरचीची जात 90 दिवसात काढण्यासाठी तयार होत असते. विशेष म्हणजे या मिरचीच्या जाती वर खूपच कमी प्रमाणात रोगांचे सावट बघायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते शिवाय उत्पादनात भरीव वाढ होते. निश्चितच अण्णा यांनी मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe