‘औरंगाबाद जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा (मिनी घाटी) हे कोवीड १९ रुग्णालय असून येथे आज २७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर कोरोना संशयितांची तपासणी करत आहोत. सुरवातीला सगळे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने आम्हाला चांगलं वाटत होतं.
पण दि. ३० मार्च रोजी पहिला पॉझिटिव्ह पेशंट आमच्या येथे दाखल झाला आणि त्या दिवसापासून कोरोना युद्धाचा आमचा लढा जास्त खबरदारीने सुरु झाला आहे. आज घडीला आमच्या रुग्णालयात २४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असून त्या प्रत्येकाला आम्हाला बरं करुन घरी पाठवण्याची इच्छा आहे. आमच्या रुग्णालयातील पहिली पॉझिटिव्ह पेशंट खूप जास्त गंभीर परिस्थितीत दाखल झाली होती.
तिच्यावर तातडीने सर्व उपचार करुन तिला मानसिक आधार देत बरं करायचं आव्हान आमच्या येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आमचे आरोग्य सेवक आम्ही सगळ्यांनी स्वीकारले होते. आमच्या प्रयत्नांना,धावपळीला यश आले आणि पाच दिवसांपूर्वी ती रुग्ण बरी होऊन घरी गेली. ही रुग्ण बरी झाली याचा तिच्या कुटुंबियांइतकाच आनंद आम्हाला आहे. कारण चौदा दिवस रुग्ण पूर्णपणे आमच्या सहवासात असतो.
त्याच्या कुटुंबापासून दूर त्याला शारीरिक, मानसिक आधार देताना आमच्याही नकळत आम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातो. त्यातून तो बरा होऊन घरी जाताना निश्चितच आम्हा सगळ्यांना आनंद होणे स्वाभाविक आहेच, पण जेव्हा रुग्ण, त्याचे नातेवाईक घरी जाताना आम्हाला डॉक्टर तुमच्या रुपाने देव भेटला, तुम्ही आता आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहात, आमच्या प्रयत्नांची ,धावपळीची दखल घेत आपलेपणा व्यक्त करतो,
तो क्षण खरोखर खूप समाधानाचा आणि ऊर्जा देणारा असतो, अशा शब्दांत कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठीच्या लढाईतील एक डॉक्टर पद्मजा अजय सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. औरंगाबाद सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या आधारे रेड झोन मध्ये असून त्या पार्श्वभूमीवर येथे आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, त्यांचे सर्व डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ,आरोग्य सेवक आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत सेवाभावाने रुग्णांची काळजी घेत आहेत.
कोरोनाला रोखण्यात सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, ते डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणूनच मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन सैनिक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.या सैनिकांची लढाई ही तितकीच अटीतटीची आणि जीवावर बेतणारी आहे,कारण कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे.
पण आज घडीला सर्व डॉक्टर आणि त्यांचा नर्सिंग स्टाफ,आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकजण रुग्णाला बरं करण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता झोकून देत काम करत आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करून संचारबंदीचा आदेश देऊन सर्वांना घरात राहण्याचे आवाहन शासन प्रशासन करत आहे.
तर दुसऱ्या बाजूला आपल्या सेवेप्रति कृतीशील निष्ठा ठेवत आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर,नर्सिंग स्टाफ हे संसर्गाच्या धोकादायक परिस्थितीत ही प्रत्यक्ष रुग्णांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्यावर उपचार करण्याचे, काळजी घेण्याचे आपले कतर्व्य बजावत आहे. हे करत असताना त्यांना मनापासून रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न असतो त्यासोबत आपल्या घरी जाताना एक सुप्त ताणही त्यांच्या मनावर असतो तो म्हणजे आपल्यामुळे घरच्यांना तर काही होणार नाही ना ही, स्वाभाविक काळजी त्यांना वाटत असते.
पण या लढवय्यांचे कुटुंबीय तसेच त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणारे आहेत. डॉ.सराफ म्हणाल्या,कोरोना संसर्गाची भीती तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे. आम्ही तर थेट पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात 24 तास ड्युटी करुन घरी जातो त्यामुळे आम्हाला आणि आमच्या घरच्यांनाही भीती, काळजी ही आहेच,
पण तरीही कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही बाहेर पडलंच पाहिजे हे ही आमचे कुटुंबीय जाणून आहेत आणि त्यांच्या भावनिक पाठिंबा आणि समंजस सहकार्यामुळेच तर इतक्या चिंताजनक परिस्थितीतही आम्ही दवाखान्यात राहून रुग्णांना व्यवस्थितपणे योग्य उपचार देऊ शकत आहे. यामध्ये आमच्या कुटंबियांची भूमिका आणि सहकार्य विशेष आहे हे डॉ.सराफ यांनी आर्वजून सांगितले. दोन वर्षापासून मिनी घाटी म्हणजेच जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.सराफ एम.डी.मेडिसीन असून यापूर्वी त्यांना स्वाईन फ्लू या आरोग्य आपत्तीला हाताळण्याचा अनुभव आहे.
आपल्या हातून रुग्ण बरा होण्याच्या भावनेतून त्याला उपचार करताना आपोआप मनात एक सकारात्मकता निर्माण होत जाते.त्यातून आपल्याला काम करत राहण्याची क्षमता वाढते. सुरवातीला काही दिवस आमच्या येथे कोरोना चाचणी करताना स्वॅब घेण्यासाठीचा तणाव होता पण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली खूप कमी काळात आमच्या टीमने मनातील भीतीवर मात करत कामाचा भाग म्हणून या सर्व जोखमीच्या गोष्टी सहजेतेने हाताळायला सुरवात केली.
शिप्टमध्ये आम्ही सर्वजण २४ तास काम करुन येथे दाखल रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेत आहोत. यामध्ये आमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी,डॉ.अर्चना भोसले, डॉ.पी.एम.कुलकर्णी, डॉ.प्रेमचंद कांबळे,डॉ.सुनील गायकवाड, डॉ.जावेद, डॉ.बकाल, डॉ.अश्वीन पाटील, डॉ.गोफणे, डॉ.वराडे यांच्यासह आमच्या येथील सर्व नर्सिंग स्टाफ,आरोग्य सेवक यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आम्ही आता पर्यंत तेरा रुग्णांना चांगले करुन डिस्चार्ज दिला आहे.
आता रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करुन त्यांना चांगले करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.ते करत असताना रुग्णांसोबत निर्माण होत जाणारा ऋणानुबंध आणि त्यांच्या तब्बेतीत होणारी सुधारणा हीच आमच्या साठी मोठी गोष्ट असते.समाजात मध्यंतरी डॉक्टरांबद्दल राग व्यक्त करणारे जरासे असुरक्षिततेचे वातावरण होते.
त्यानंतर आता या संकट वेळी सर्वत्र शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर,आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वासाची आपुलकीची भावना अनुभवायला मिळते आहे, हा निश्चितच चांगला सुखावणारा बदल आहे, अशा भावना डॉ.सराफ यांनी व्यक्त केल्या. कोरोनाच्या युद्धाचे प्रत्यक्ष रणांगण असलेल्या दवाखान्यांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांची ही प्रातिनिधीक भावना आहे.या युद्धाला जिंकण्यात मोलाचे योगदान देणा-या सर्व डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश मिळो…..