Soybean Farming : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. एका शासकीय आकडेवारीनुसार राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. अशा परिस्थितीत, राज्यातील तसेच देशातील सोयाबीन उत्पादकांची उत्पादन वाढवण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांकडून कायमच वेगवेगळे संशोधन केले जाते. सोयाबीनच्या नवीन जाती विकसित केल्या जातात.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने देखील सोयाबीनची अशीच एक नवीन जात विकसित केली आहे. एमएयुएस-७२५ असे या जातीचे नाव असून ही जात केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार केंद्र सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राजपत्रात समाविष्ट करण्यात आली आहे.
त्यामुळे या जातीच्या प्रसाराला चालना मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेली ही सोयाबीनची नवीन जात महाराष्ट्रात पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या जातीच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनच्या एमएयुएस-७२५ जातीच्या विशेषता खालीलप्रमाणे :-
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ही जात पेरणीनंतर 90 ते 95 दिवसात काढणीसाठी तयार होते. निश्चितच ही एक लवकर येणारी जात आहे. या जातीच्या सोयाबीन पिकाला अधीक शेंगा लागतात. वीस ते पंचवीस टक्के शेंगा या चार दाण्याच्या असतात. याच्या 100 दाण्यांचे वजन 10 ते 13 ग्राम असते. या जातीपासून हेक्टरी उत्पादन 25 ते 31.50 क्विंटल इतके आहे.
ही जात कीटक व रोगास मध्यम प्रतिकारक आहे. महाराष्ट्रासाठी पेरणी योग्य आहे. निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी या जातीची पेरणी फायदेशीर ठरणार आहे. आता या जातीचा समावेश भारतीय राज्यपत्रात देखील करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच या जातीच्या प्रसाराला आणखी वाव मिळणार आहे.